Header Ads Widget

Responsive Advertisement

अनाथ, विधवा, दिव्यांग आणि व्हीजे-एनटी साठी अभियान राबवून योजना द्या – राज्यमंत्री बच्चू कडू p10news*अनाथ, विधवा, दिव्यांग आणि व्हीजे-एनटी साठी अभियान राबवून योजना द्या – राज्यमंत्री बच्चू कडू*

▪️जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या योजनांचा घेतला आढावा

▪️गडचिरोलीच्या नाविण्यपूर्ण शैक्षणिक ‘फुलोरा’ उपक्रमास दिली भेट

मुख्य संपादक (EDITOR In CHIEF)/गडचिरोली, दि.18* : समाजात अनाथ मुले, विधवा भगिनी, दिव्यांग तसेच व्हीजे-एनटी मधील गरजूंना वेगवेगळ्या प्रकारे मदतीची गरज असते. कित्येक पात्र लाभार्थी योजना माहित नसल्याने वंचित राहतात. मुळात ते असाहय्य असल्याने त्यांचा शक्यतो बाहेर वावर कमी असतो. त्यांना आपण स्वत:हून त्याठिकाणी मदत करणे आवश्यक आहे. त्याकरीता प्रशासनाने त्यांच्यासाठी विविध अभियान - कार्यशाळा आयोजित करून सरकारी योजना त्यांना द्याव्यात अशा सूचना राज्याचे शालेय शिक्षण, महिला व बाल विकास, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत उपस्थितांना दिल्या. त्यांनी शालेय शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण तसेच समाजकल्याण विभागाचा आढावा घेतला व शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत सद्यस्थिती जाणून घेतली. कोरोना काळात अनेक मुले अनाथ झाली, काही महिला विधवा झाल्या, त्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाने योजना सुरू केल्या. त्या योजना वेळेत आणि गरजूंना पोहचण्यासाठी गतीने कामे करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. शिल्लक पात्र लाभार्थ्यांना योजना देण्यासाठी अंगणवाडी कार्यकर्ती पासून सीडीपीओ पर्यंत सर्वांना उद्द‍िष्ट वाटप करा व विधवा तसेच अनाथांना मदत करा असे आदेश त्यांनी शिक्षण विभागाला दिले. शासनाच्या अनेक योजनांमध्ये त्या महिला व बालके पात्र होतात. त्याची माहिती त्यांना देवून योजनेत समावून घेण्यासाठी अभियान स्तरावर कामे पूर्ण करावीत. या आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा परिषदे अंतर्ग येणारे विषय राज्यमंत्री महोदयांना सादरीकरणाद्वारे सांगितले. यावेळी आमदार डॉ.देवराव होळी, अतिरीक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील व संबंधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.


             महिला अर्थिक विकास महामंडळामार्फत प्रत्येक तालुक्यातून दोन तीन गटांचे उद्योग व्यवसाय वाढतील यासाठी नियोजन करावे. यातून इतरांना पाठबळ मिळेल व आपोआपच गटांमार्फत व्यवसाय उभारणीला चालना मिळेल असे मत राज्यमंत्री बच्चु कडू यांनी व्यक्त केले. जिल्हा राज्यात सर्वात जास्त मोह असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. बचत गटांना मोह प्रक्रियेवरती उद्योग उभारणीला मोठा वाव आहे. त्याकरीता बचत गटांचा मोह या विषयाशी संबंधीत संघ स्थापन करून मोह फुल उद्योग प्रक्रिया सुरू करता येईल.  पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे वनोपजावर आधारीत प्रकल्प उभारणीस प्राधान्य आहे. मी त्यांच्याशी बोलून या संघास निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन असे ते बैठकीत म्हणाले.  त्यासाठी वन विभाग, महला अर्थिक विकास महामंडळ व कृषी विभागाने एकत्रित येवून मोह फुलांचे नेमके उत्पादन किती होते ? त्यासाठी काय उद्योग उभारता येईल ? व किती गट यासाठी तयार आहेत ? याची माहिती एकत्रित करून प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. व्हीजे-एनटी मधील जिल्हयातील एकुण नेमकी लोकसंख्या काढून त्यांना किती प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ मिळाला याबाबत माहिती घेण्याचे संबंधित विभागाला आदेश दिले. त्यांच्या साठी सद्या जिल्हयात असलेल्या 19 पाड्यांवर कार्यशाळा घेवून योजनांची माहिती देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.


*प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची गुणवत्ता तपासण्याच्या केल्या सूचना*


शालेय अध्यापनातील गुणवत्ता तपासणीबाबत मार्गदर्शक सुचनांप्रमाणे सर्व शिक्षकांची गुणवत्ता तपासावी. तसेच सर्व शिक्षकांची गुणवत्तेच्या आधारावर तीन प्रकारात अ, ब तसेच क वर्गवारी करून उत्कृष्ट कार्य केलेल्यांचा सन्मान करावा तसेच क वर्गातील शिक्षकांवर कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचना त्यांनी बैठकीत दोन्ही शिक्षण अधिकाऱ्यांना केल्या. यातून शिक्षणाचा दर्जा वाढण्यास मदत होणार आहे.


*फुलोरा उपक्रमाबाबत दिभना येथील शाळेला भेट* - गडचिरोली जिल्हयात 'फुलोरा' या नाविण्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमाची अंमलबजावणी सूरु आहे. दिभना येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत राज्याचे शालेय शिक्षण, महिला व बाल विकास राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू यांनी भेट देवून फुलोरा प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांनी विदयार्थ्यांना मनोरंजन, खेळ व प्रात्यक्षिकाद्वारे विविध प्रकारचे शिक्षण देण्यारे घटक समजून घेतले. खेळत खेळत शिक्षण आत्मसात करताना त्यांनी तेथील विदयार्थी व शिक्षकांशी गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी शिक्षणानंतर विद्यार्थ्यांनी भविष्यात काय करावे यावर कार्यशाळा घेण्याचे सुचविले. तसेच शाळेला भेट म्हणून साहित्य खरेदीसाठी 5 हजार रुपये दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी 'फुलोरा' प्रकल्प राज्यमंत्री महोदयांना सांगितला. सोबत अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, शिक्षणाधिकारी माध्यमिक आर.पी.निकम, शिक्षणाधिकारी प्राथमिक अरुण धामणे, शाळेतील शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments