मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)
सिरोंचा ते आलापल्ली मार्गावर जड वाहनांना मज्जाव.
फक्त प्रवासी बसेस, पाणीपुरवठा, महावितरण, दूरसंचार, रस्ते दुरुस्तीसंदर्भातील वाहनांना प्रवेश.
5 जुलै ते 30 सप्टेंबर पर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा – जिल्हाधिकारी.
गडचिरोली, दि.01(जिल्हा प्रतिनिधी- नंदलाल कन्नाके) : - राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 सी वरील सिरोंचा ते रेपनपल्ली (59 कि.मी.) व रेपनपल्ली ते गुड्डीगुड्डम (19 कि.मी.) ह्या रोडवरील काम रा.म.प्राधिकरणाद्वारे सुरु असून सिरोंचा ते आलापल्ली मार्गावर मोठ्या प्रमाणावर जड वाहतुक सुरु आहे. सदरील मार्ग जड वाहतुकीस पावसाळ्यात वाहतुकीस पूर्णत: योग्य नसल्याने सदरील मार्गावरील जडवाहतूक ही पर्यायी मार्गाने वळती करण्याची विनंती कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालय, गडचिरोली ह्यांनी केली होती. राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 सी वरील सिरोंचा ते आलापल्ली मार्गावर सातत्याने सुरु असलेल्या जड वाहतुकीमुळे व निर्माणाधिन महामार्गाचे कामामुळे पावसाळ्यात सदरील मार्गावर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली यांनी, आलापल्ली ते सिरोंचा मार्गावर दोन्ही बाजुने सर्व प्रकारचे जड वाहनांची वाहतुक (प्रवासी बसेस व पाणीपुरवठा/महावितरण/दूरसंचार/रस्ते दुरुस्तीसंदर्भातील वाहने वगळून) वाहनांना दिनांक 05 जुलै, 2023 चे मध्यरात्रौ 00.01 ते 30.09.2023 चे रात्रौ 11.59 पर्यंत प्रवासास मज्जाव केला आहे. उक्त कालावधी करिता पर्यायी मार्ग म्हणून सिरोंचा ते आलापल्ली मार्गावर येणाऱ्या वाहनांकरिता सिरोंचा – मंचेरियाल – राजुरा - बल्लारशाह-चंद्रपूर-गडचिरोली असेल तर आलापल्ली हून मंचेरियाल मार्गे जाणाऱ्या मार्गासाठी आलापल्ली - आष्टी- बल्लारपूर-मंचेरियाल या पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत.
मोटर वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ व ११६ चे तंतोतंत पालन करावे. वाहतुकीस अयोग्य रस्ता वा पुल बिना बॅरेकंडींग वा योग्य काळजी न घेता खुले ठेवल्यास सदर मार्गावर अपघात झाल्यास संबंधित विभागप्रमुख तसेच संबंधित कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच सदरचे आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या कोणत्याही वाहतुकदारास वा व्यक्तीविरुद्ध भारतीय दंडसंहिता 1860, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 तसेच प्रचलित नियमानुसार कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक पोलीसांना असणार आहेत.
मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक. ( EDITOR IN CHIEF).
0 Comments