Header Ads Widget

Responsive Advertisement

*आपत्ती दरम्यान वेळ आणि जलद संपर्क यांचा मेळ घाला – पालक सचिव मिलींद म्हैसकर* p10news

 

मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक(EDITOR IN CHIEF)

*आपत्ती दरम्यान वेळ आणि जलद संपर्क यांचा मेळ घाला – पालक सचिव मिलींद म्हैसकर*

*जिल्हयातील आपत्ती व्यवस्थापनबाबत तयारीचा घेतला आढावा*

*गडचिरोली, दि.07* : गडचिरोली जिल्हयात दरवर्षीच कुठेना कुठे आपत्तीजन्य स्थिती निर्माण होत असते, यावेळी नागरिकांना मदतीसाठी कमी वेळेत संपर्क साधून आवश्यक मदत पोहचवा असे निर्देश गडचिरोली जिल्हयाचे पालक सचिव तथा प्रधान सचिव गृहनिर्माण, महाराष्ट्र राज्य मिलींद म्हैसकर यांनी प्रशासनाला दिले. ते आज गडचिरोली येथे आपत्ती व्यवस्थापनाबाबतचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी आपत्ती दरम्यान उपलब्ध असलेली वेळ व तातडीने करावयाचा संपर्क यांचा व्यवस्थित मेळ घालण्याचे प्रशासनाला आवाहन केले.

जिल्हयातील नद्या, पाऊस तसेच प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत माहिती घेतली व आवश्यक सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी तयारीबाबतचे सादरीकरण केले. तर बैठकीला पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, संबंधित विभागांचे विभाग प्रमुख व ऑनलाईन स्वरूपात सहायक जिल्हाधिकारी अंकित, शुभम गुप्ता उपस्थित होते. 


बैठकीत त्यांनी जिल्हयात कुठेही कोणीही पावसामुळे अथवा नदीच्या पाण्यामूळे दगावू देवू नका आणि जिल्हयात शुन्य मनुष्य जीवीतहानी राहण्यासाठी सर्वांनी कार्य करावे अशा सूचना केल्या. जिल्हयात दरवर्षी पाण्यामूळे संपर्क तुटणाऱ्या गावांमधे काय काय कामे झाली व कोणती कामे होणे बाकी आहे याबाबत प्रांत, तहसिलदार यांचेशी ऑनलाईन संवाद साधला. बैठकीत दुर्गम भागातील संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये राशन पुरवठा झाला का याबाबत माहिती देण्यात आली. गरोदर माता आणि पुरामूळे बाधित झालेल्या लोकांना राहण्यासाठी भामरागड, एटापल्ली आणि अहेरी येथे व्यवस्था केल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. 

संजय सरोवर, गोसी खुर्द तसेच मेडीगट्टा बॅरेज येथील संबंधित अधिकारी यांच्याशी सतत संपर्क ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दुर्गम भागात औषधांचा पुरवठा, शालेय पोषण तसेच शिक्षण सुविधा वेळेत जाण्यासाठी तातडीने पावले उचला अशा सूचनाही त्यांनी उपस्थितांना केल्या. पालक सचिव यांनी यावेळी राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) कुठे कुठे तैनात केले आहे याबाबत माहिती जाणून घेतली. जिल्हयात दोन पथके दाखल झाली असून त्यामधील सदस्यांची तीन ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे. यात गडचिरोली येथे 17 जण, अहेरी येथे 8 व भामरागड येथे 8 जण कार्यरत आहेत. त्यांचेकडे पूरस्थितीत मदत करण्यासाठी बोट व लाईफ जॅकेटसह आवश्यक साहित्य उपलब्ध असणार आहे.

*गडचिरोली लाईव रेडिओ ॲपची केली पाहणी*

आपत्ती दरम्यान आवश्यक सूचना देण्यासाठी गडचिरोली लाईव्ह या रेडीओ ॲपचा उपयोग प्रशासनाकडून केला जाणार आहे. मार्च 2022 मधे जिल्हयाचे तत्कालीन पालकमंत्री व सद्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्टुडिओचे लोकार्पण झाले होते. आज पालक सचिव मिलींद म्हैसकर यांनी भेट देवून स्टुडिओची पाहणी केली. सद्या  या ॲपवर दैनंदिन हवामान, पावसाळयात कृषीविषयक मार्गदर्शन, पावसाळयातील आरोग्याविषयी काळजी व उपाय योजना याबाबतची माहिती दिली जाते. यावेळी त्यांनी या उपक्रमाबाबत प्रशासनाचे कौतुक केले.

                     मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.                                            (EDITOR IN CHIEF)


Post a Comment

0 Comments